★किल्ले बांधकामा मधील चुण्याचा घाणा !
[लोकवास्तव विशेष…]
बऱ्याचदा गडकिल्ल्यांवर फिरताना ते दगड ते बांधकाम पाहून प्रश्न पडतो त्याकाळी काय वापरत असावेत बांधकामासाठी एवढे दगड वर कुठून आले असावेत !
महाराष्ट्रातील इतिहासाबरोबरच इथल्या दुर्गांची दुर्गबांधणी हा एक अभ्यासाचाच वेगळा विषय आहे.छत्रपति शिवाजी महाराजांच्या काळातील बांधकामाचा अभ्यास केल्यास त्यात चुना वापरला जाई हे तर सर्वांना ठाऊकच आहे. याचे कारण चुन्याचे गुणधर्म व त्याची नैसर्गिक उपलब्धतता. किल्ले बांधकाम मधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे चुना. मध्ययुगीन कालखंडात बांधकामामध्ये चुन्याचा वापर केला जात होता. रायगड , तिकोना ,रोहिडा , वसंतगड , केंजळगड , विसापूर , किल्ल्यावरील घाना आणि त्यात चुना दळण्यासाठी वापरण्यात आलेल्या दगडाची चाक आजही सुस्थितीत आहे. घाण्याच्या चरामध्ये चुनखडी, वाळू, गुळाचे पाणी ,मेथीच्या बिया, बेलफळ यांसारखे पदार्थ एकत्र केल्यावर हे चाक त्यावेळी बैल लावून फिरवले जात होते, फिरवल्यामुळे सर्व पदार्थ एकजीव होत असत. चुना वापरण्या आधी चुण्यावर थोडी प्रक्रिया करावी लागत कारण नैसर्गीक रित्या जी उपलब्ध असे ती चुनखडी, ती भट्टी मध्ये भाजून काढल्यावर ह्या चुनखडीची पूड तयार होते, ह्या पूड मध्ये जास्त प्रमाणात पाणी मिसळल्यावर चुना तयार होतो. हा चुना बारीक वाळुबरोबर चुन्याच्या घाण्यावर घोटला (दळला) जाई.चुन्याचा घाणा म्हणजे दगडांचे वर्तुळ ज्या वर्तुळात एक मोठा चाकासारखा दगड बैलांच्या सहाय्याने फिरवला जात असे. ह्या दगडाच्या सहाय्याने चुना व वाळु याचे जे मिश्रण तयार होई ते बांधकामास वापरले जाई.चुना सावकाश घट्ट होत असल्याने बांधकामाला तडे जाण्याची शक्यता कमी असायची. त्यातल्या त्यात उष्णता रोधक असल्याने गारवा देखील मिळायचा.आजही महाराजांच्या कैक गडावर “चुन्याचे घाणे” आढळतात…