★बीड जिल्ह्यासंदर्भात अजितदादांकडून मोठ्या घोषणांची शक्यता !
बीड | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी १७ ऑगस्ट रोजी बीडमध्ये सभा घेतली होती. त्या सभेला प्रत्युत्तर म्हणून अजितदादा गटाकडून येत्या २७ ऑगस्ट रोजी बीडमध्ये जाहीर सभा घेण्यात येणार आहे, मात्र हे प्रत्युत्तर विकासकामांनी देण्यात येणार आहे.यात परस्परांवर टीका होणार नाही. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार तयारीलाही लागले आहेत. बीड जिल्ह्यातील विकासकामे, दुष्काळी परिस्थिती, विविध प्रस्तावित जलप्रकल्प, वीजपुरवठा व महावितरणकडील अन्य समस्यांचे निराकरण आदी विषयी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी अजितदादांनी कृषी मंत्री धनंजय मुंडेंसह बीडमधील लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. बीड जिल्ह्यातील समस्यांवरील उपाययोजनांसाठी सर्व संबंधित विभागांच्या स्वतंत्र बैठका घेऊन तात्काळ निर्णय घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. यामुळे प्रत्युत्तर सभेत अजितदादांकडून बीडमधील विकासकामांसंदर्भात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे.
अजितदादांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन तट पडले आहेत. शरद पवार विरुद्ध अजित पवार असे राष्ट्रवादीत चित्र आहे. बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. शरद पवार यांनी १७ ऑगस्ट रोजी बीडमध्ये सभा घेतली होती. बीड जिल्हा राखणे हे अजितदादा गटासमोरचे उद्दिष्ट आहे. स्वत: कृषी मंत्री धनंजय मुंडे हे बीडचे आहेत. त्यामुळे या सभेला प्रत्युत्तर म्हणून अजितदादा गटाकडून २७ ऑगस्ट रोजी बीडमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे, मात्र या सभेसाठी अजितदादांनी नवीन स्ट्रॅटेजी आखली आहे. जाहीर सभेमध्ये कोणत्याही घटकांवर टीका न करता बीड जिल्ह्यातील विकासकामांचा लेखाजोखा मांडण्यात येणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.
★बीडच्या विकासकामांवर बैठक
बीड जिल्ह्यातील विकासकामे, दुष्काळी परिस्थिती, विविध प्रस्तावित जलप्रकल्प, वीजपुरवठा व महावितरणकडील अन्य समस्यांचे निराकरण आदी विषयी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडेंसह लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. धनंजय मुंडे यांच्यासह बीड जिल्ह्यातील आमदार प्रकाश सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार संजय दौंड, राजकिशोर मोदी आदींची या बैठकीला उपस्थिती होती. या सर्वांनीच बीड जिल्ह्यातील विविध प्रलंबित कामांसह अन्य प्रस्तावित व तातडीची कामे तसेच दुष्काळी परिस्थितीसंदर्भात माहिती दिली. यावर उपाययोजना करण्यासाठी सर्व संबंधित विभागाच्या स्वतंत्र बैठका घेऊन निर्णय घेण्याचे अजितदादा पवार यांनी निर्देश दिले आहेत. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या दालनात महापारेषण व संचालन विभागाकडील प्रलंबित विषयासंदर्भात बैठक संपन्न झाली. त्याही बैठकीस बीड जिल्ह्यातील आजी, माजी आमदार व प्रमुख लोकप्रतिनिधी उपस्थित होते. माजलगाव धरणातून परळी औष्णिक विद्युत केंद्रास पाइपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्यासंदर्भात देखील धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालयात बैठक पार पडली.
★आमदार लागले जोमाने कामाला!
बीड जिल्ह्यातील अजित दादा गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार बीड जिल्ह्यात होणाऱ्या 27 तारखेच्या सभेसाठी कृषिमंत्री ना.धनंजय मुंडे, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार प्रकाश सोळुंके, मा. आमदार अमरसिंह पंडित, बीडचे राष्ट्रवादी प्रवेश केलेले क्षीरसागर कुटुंब, अंबाजोगाईचे राजकिशोर मोदी, सर्वांनीच कंबर कसली असून सभा जोरदार आणि विकासाच्या मुद्द्यावर प्रभावशाली होणार असल्याची चर्चा सुद्धा रंगली आहे.