★आष्टीत आनंदात आणि उत्साहात साजरा
आष्टी | प्रतिनिधी
भारतीय अंतराळ संस्था (इस्त्रो)ची बहुप्रतिक्षित मोहीम ‘चांद्रयान-३’ भारतीय वेळेनुसार बुधवार दि.२३ ऑगस्ट रोजी सायं.०६:०४ वा. चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरले. हा ऐतिहासिक क्षण ‘याची देही याची डोळा’ पाहायला मिळाला हे आपले सर्वांचे भाग्य.
संपूर्ण जगाचे लक्ष वेधलेल्या ‘चांद्रयान-३’ हे अभियान यशस्वी झाल्याबद्दल आष्टी तालुक्यातील मुर्शदपूर मधील विनायकनगर भागातील रहिवासी विठ्ठलराव बनसोडे आण्णा व पोपटराव घुले सर यांनी परिसरातील युवक, महिला भगिनी, मित्र परिवार व नागरिकांना एकत्र घेऊन भारतीय अंतराळ संस्था (इस्त्रो)चे ‘चांद्रयान-३’ चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरले. हा ऐतिहासिक क्षण अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा केला. यावेळी देशाचा तिरंगा ध्वज हातात घेऊन सर्वांनी “भारत माता की जय” “वंदे मातरम” च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तसेच यावेळी तोफांची सलामी देत भारतीय शास्त्रज्ञांचे आभार व्यक्त केले. यावेळी भाऊसाहेब घुले, तुषार काळे, अशोक पोकळे, चंद्रकांत तुपे, स्वप्निल घुले, मोहन शिंदे, विधाते सर, बाळासाहेब कुलकर्णी, संतोष कदम, गुरु काळे यांच्यासह महिला भगिनी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
भारतासह जगभरतील नागरिक ‘चांद्रयान-३’ अभियानाच्या या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे सर्व संशोधक, शास्त्रज्ञ व त्यांचे सर्व सहकारी यांनी संशोधनाची पूर्ण तयारी करूनच भारतीय शास्त्रज्ञांनी चंद्राला गवसणी घातली आणि मोहीम फत्ते केली. या यशस्वी मोहिमेमुळे भारत विज्ञानात जगात बलाढ्य आहे, यावर आणखी एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. तसेच भारतातील या महत्वाच्या मोहिमेतील रात्रंदिवस कष्ट घेऊन ‘चांद्रयान-३’ मोहीम यशस्वी करून अभूतपूर्व यश मिळवणाऱ्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे संशोधक, शास्त्रज्ञ व त्यांचे सर्व सहकारी तसेच देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांचे आणि केंद्र सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन करत सर्व देशवासियांना शुभेच्छा व्यक्त केल्या.