★‘तलाठी भरती’ साठी बेरोजगारांकडून उकळले 1 अब्ज 4 कोटी
मुंबई : वृत्तांत
सरकारी नोकरभरती हा सरकारचा उत्पन्नाचा नवा मार्ग आहे की काय, असा प्रश्न गुरुवारपासून सुरू झालेल्या तलाठी भरतीने निर्माण केला आहे. या भरतीसाठी सरकारने प्रत्येक उमेदवाराकडून एक हजार रुपये शुल्क उकळले आणि पुन्हा उमेदवाराने सुचवलेली तीन पसंतीची म्हणजेच सोयीची परीक्षा केंद्रे बाजूला ठेवून राज्याच्या दुसर्याच कोपर्यातील परीक्षा केंद्र बहाल केले. आधीच हजाराचे परीक्षा शुल्क आणि आता परीक्षा देण्यासाठी जाण्या-येण्याचा व केंद्रावर राहण्याचा खर्च असा मोठा भुर्दंड या बेरोजगारांवर लादला गेला आहे. एकीकडे बेरोजगारी उफळून आलेली असताना त्या बेरोजगारांच्याच खिशावर दरोडा टाकला जात आहे.पहिल्या दोन तारखांचे उमेदवार या परीक्षा प्रक्रियेत भरडले गेले तरी ही प्रक्रिया बदलल्यास आणि परीक्षा केंद्रांचा निर्णय फिरवल्यास त्यापुढील सर्व तारखांच्या परीक्षार्थीची गैरसोय टळू शकते. जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवरच परीक्षार्थीना परीक्षा देण्याची मुभा द्यावी, त्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश टीसीएस कंपनीला द्यावेत आणि उमेदवारांकडून वसूल केलेले एक हजार रुपयांचे शूल्क प्रवासखर्च म्हणून तात्काळ परत करण्याची मागणीही आता पुढे आली आहे.