★स्वातंत्र्यदिनी बीड परळी महामार्गावर दोन तास रस्ता रोको
बीड /प्रतिनिधी
माजलगाव तालुक्यातील चोपनवाडी येथील रस्त्याच्या प्रकरणी समस्त गावकरी एक होत स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर रास्ता रोको चे आयोजन आज मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत बीड परळी महामार्गावर करण्यात आले.जोपर्यंत रस्ता मान्य होणार नाही तोपर्यंत ग्रामस्थ रस्ता रोको उठवणार नाहीत अशा भूमिकेत ठाम राहिल्याने प्रशासनाची दानादान उडाली. बांधकाम विभागाचे अभियंता व पोलिसांनी मध्यस्थी केल्याने तात्पुरते हे आंदोलन मागे घेतले.
माजलगाव तालुक्यातील चोपन वाडी ते बीड परळी हायवे या रस्त्याला मंजुरी मिळून जवळपास चार वर्षे लोटत आले, मात्र अद्याप या रस्त्याचे काम न झाल्याने दळणवळणासाठी अनेक अडचणी या ग्रामस्थांना येत आहेत.मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बीड परळी हायवे ते चोपनवाडी या पावणे तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या कामास मंजुरी मिळाली. जवळपास एक कोटी तीस लाख रुपये मंजुर झाले. मात्र गेल्या चार वर्षांपासून रस्त्याचे काम न झाल्याने अनेक हालअपेष्टा चोपणवाडी ग्रामस्थांना भोगाव्या लागत आहेत. जवळपास अकराशे जनसंख्या असलेल्या या गावातील ग्रामस्थांना चोपनवाडी ते बीड परळी हायवेवर येताना जवळपास अर्धा ते पाऊण तास वेळ लागतो. अनेक विद्यार्थ्यांना केवळ रस्ता खराब असल्याने शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.अबालवृद्ध,रुग्णांना प्रचंड शारीरिक व मानसिक त्रास या खराब रस्त्यामुळे सहन करावा लागत असून शासन-प्रशासन या गावाकडे लक्ष द्यायला तयार नसल्याने चोपनवाडी ग्रामस्थांनी एकत्र येत स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी बीड परळी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. गावातील विद्यार्थ्यांसह महिला, अबाल वृद्ध या रास्ता रोकोत शामिल झाल्याने मोर्चाला भव्य रूप आले होते. सकाळी नऊ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत जवळपास दोन ते अडीच तास चक्काजाम झाल्याने तीन किलोमीटर अंतरापर्यंत दोन्ही बाजूने वाहने उभी होती. शासकीय बांधकाम विभाग बीडचे कार्यकारी अभियंता फड यांच्या लेखी आश्वासनानंतर हा रास्ता रोको गावकऱ्यांनी पाठीमागे घेतला. दिंद्रुड पोलिसांनी कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही यासाठी विशेष बंदोबस्त याप्रसंगी लावला होता.