★शेतकऱ्यांची पीक वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड
कुसळंब | प्रतिनिधी
पाटोदा तालुक्यातील अंमळनेर, कोतन, पांढरवाडी, उंडेवाडी, पिंपळवंडी, साबळेवाडी, दौलतवाडी, डागाचीवाडी, मिसाळवाडी व परिसरातील उडीदाच्या पिकावर करपा सदृश्य रोगाचा तसेच विविध किडींचा प्रादुर्भाव झाला आहे.त्यामुळे शेकडो एकर क्षेत्रावरील उडीद पीक हे जळाले आहे.अगोदरच उशिरा पेरणी होऊन कसेबसे आलेले पीक ऐन जोमात असतानाच कोमात गेले आहे.
यंदा पाऊस उशिरा पडल्याने पेरणी उशिरा झाली.या वर्षी एलनीनो मुळे पर्जन्यमान कमी राहील या हवामान विभागाच्या दाव्यानुसार शेतकऱ्यांनी कमी कालावधीची पिके निवडावी असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले होते. त्यानुसार,सोयाबीन,मूग याबरोबर उडीद पीक हे 60 ते 75 दिवसाचे कमी कालावधीचे नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांनी शेकडो एकरवर पेरणी केली.परंतु, सुरुवातीपासूनच दोन तीन दिवस पाऊस तर दोन तीन दिवस ऊन अन बाकी दिवस ढगाळ,कोंदट वातावरण.तापमानात वाढ व जमिनीत ओल,कधी ढगाळ,कधी रिमझिम तर कधी उष्ण वातावरण याचा प्रकाशसंश्लेषण क्रियेवर याचा परिणाम होत आहे.त्यामुळे अन्नद्रव्ये निर्मितीमध्ये घट होऊन, पर्यायाने पिकांची वाढ खुंटत आहे.त्यामुळे उडीद पिके कमजोर पडू लागली आहे.त्यातही प्रतिकूल परिस्थिती असुनही फुले आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत आलेले हे पीक जोम धरू लागले असतानाच या पिकावर करपा सदृश्य रोगाचा आणि विविध किडींचा प्रादुर्भाव झाल्याने जोमात आलेले पीक जळू लागले आहे.या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकरी महागडी औषधे फवारणी करत आहेत. परंतु,त्याचा पिकांवर पाहिजे असा परिणाम दिसून येत नसल्याने या रोगामुळे उत्पादनात 60 ते 70 टक्के घट होणार असून पेरणीचा खर्च निघणेही मुश्किल झाल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडणार आहे.आजमितीला हीच परिस्थिती सोयाबीन,तूर,मूग,कापूस या खरिपातील मुख्य पिकांवर मावा,फुलकिडे, तुडतुडे,आणि पांढरी माशी या रस शोषण करणाऱ्या व रोगांच्या प्रादुर्भावास कारणीभूत ठरणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.उडीद पिकासारखी परिस्थिती या पिकांची होऊ नये म्हणून वेळीच पीक वाचवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यावर शेतकऱ्यांचा मोठा खर्च होतो आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढून उत्पन्नात घट होणार असून शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.उडीद पिकावरील रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होऊन शेकडो एकरवरील पीक जळत आहे.ते थांबवले कसे जाईल यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे जरुरीचे असताना कृषी विभाग हा अंमळनेर आणि परिसरातील शेतकऱ्यांकडे दूर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.पर्यायी,शासनाने हा विषय गांभीर्याने घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उडीद या पिकाचे पंचनामे करून विम्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.कृषिमंत्री हे बीड जिल्ह्यातील आहेत.त्यामुळे पिकांचे पंचनामे होऊन नुकसानभरपाई मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा आहे.
★अंमळनेर मंडळातील पिकपेरा
सोयाबीन–6871 हे.
कापूस–239 हे.
तूर–357 हे.
मूग–284 हे.
उडीद–578 हे.
बाजरी-375 हे.
(ही आकडेवारी अंतिम नाही.)
★पिकांसाठी महत्त्वाचे…
शेतकऱ्यांनी उडीद पिकावर पुढीलप्रमाणे फवारणी करावी. डायमिथोएट–30ml,कार्बनडायझिम–15gm +ग्रेड–2–30ml प्रति पंप फवारावे..
– शिंदे साहेब
तालुका कृषी अधिकारी, पाटोदा.