★एक वर्ष करणार अभ्यास ; वातावरणाच्या परिणामांच्या ‘एएसआय’ घेणार नोंदी
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
प्रदूषणाने काळवंंडलेल्या ‘बीबी का मकबऱ्या’वर नेमका परिणाम कशाचा होतो… पर्यटकांच्या श्वासातून निघणाऱ्या कार्बन डायऑक्साइडचा की गाड्यांच्या धुराड्यातून ओकणाऱ्या कार्बन मोनो ऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइडचा… मकबऱ्याच्या मुलाम्यावर पावसात सर्वाधिक झडतो की उन्हात सर्वाधिक तापतो? … यासारख्या अनेक प्रश्नांची आता ठोस उत्तरे मिळणार आहेत आणि शास्त्रशुद्ध नोंदीही ठेवल्या जाणार आहेत. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या (एएसआय) विज्ञान शाखेतर्फे येत्या आठवड्यापासून या अभ्यासास सुरुवात केली जाणार आहे.पांढरा शुभ्र चमकणारा बीबी का मकबरा ऊन, पाऊस, हवा, तसेच बदलत्या वातावरणामुळे काळवंडला असून ठिकठिकाणी त्याच्या प्लास्टरचीही पडझड होत आहे. त्यामुळे पर्यटकांची घोर निराशा होत असून पर्यटकांनी जतन-संवर्धन करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाची विज्ञान शाखा मकबऱ्या शास्त्रोक्त अभ्यास करणार आहे. ‘अ स्टडी ऑफ एन्व्हायर्नमेंटल इम्पॅक्ट अॅट बीबी का मकबरा’ हा अभ्यास केला जाणार असून यातून मकबरा का काळवंडतोय?, याची कारणे शोधली जाणार आहेत.
★संवर्धनासाठी आराखडा करणार
1 ऑगस्टपासून मकबऱ्यात विविध यंत्रणा बसवली जात असून त्याद्वारे वातावरणाची आणि हवेच्या शुद्धतेची मोजणी केली जाणार आहे. तसेच याच संदर्भातून पर्यटकांची गणनाही केली जाणार असल्याची माहिती विज्ञान शाखेचे उपअधीक्षक पुरातत्त्व रसायनज्ञ डॅा.श्रीकांत मिश्रा यांनी दिली. या डेटाच्या आधारावर मकबऱ्याच्या संवर्धनाचा कृती आराखडा तयार केला जाणार आहे.