निखळ नैतिकतेचा झरा : अण्णाभाऊ साठे
अण्णा भाऊंच्या लेखनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या लेखनातून वाहणारा निखळ नैतिकतेचा झरा. त्यामुळे अण्णा भाऊ आपल्या एकूण साहित्यातून एक संपूर्ण बंडखोर, परिवर्तनवादी, नास्तिक आणि मानववादी तत्त्वज्ञान समाजामध्ये प्रवर्तित करण्याचा प्रयत्न करतात.
आधुनिक मराठी साहित्य विश्वाचा आढावा घेतला तर अभिजात जागतिक दर्जाच्या साहित्यिकांशी तुलना करता येतील असे लेखक हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेही नाहीत. पण अण्णा भाऊ साठे व बाबूराव बागूल या दोघांचे स्थान मात्र निश्चितच वरच्या दर्जाचे आहे. कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णने, नाटक या साऱ्या वाङ्मयीन प्रांतांत सामर्थ्याने विहार करणारे अण्णा भाऊ साठे हे महत्त्वाचे भारतीय साहित्यिक होत. अनेक कवींनी वृत्तांची आणि छंदांची निर्मिती केली आहे. त्यामध्ये कोणतेच नावीन्य नाही. परंतु एखाद्या कला व वाङ्मय प्रकाराला पूर्णपणे आशय विषयासह बदलून टाकणे आणि तरीही त्या प्रकाराची लोकप्रियता कमी होऊ न देणे हे अभूतपूर्व काम अण्णा भाऊंनी केले. स्त्रीच्या रूपसौंदर्याचे मसालेदार वर्णन, शृंगारिक हावभाव आणि अश्लील विनोद यांच्या साह्याने लोकरंजन करणाऱ्या तमाशाला अण्णा भाऊंनी चळवळीच्या हत्याराची लखलखीत धार दिली. ईशस्तवनाच्या जागी कामगार स्तवन आले आणि गणपतीच्याऐवजी मातृभूमीचा गण आला. अण्णा भाऊंनी हा केलेला बदल जनतेने स्वीकारला..मराठी साहित्याचे विविध प्रवाह पाहिले तर त्यांना एकारलेपणाचा शाप असल्याचे दिसून येते. लेखक आपले दुःख, आपली जात, आपली मालमत्ता व जात संस्कृती यांना सोडताना दिसून येत नाहीत. जागतिक साहित्यामध्ये मॅक्सिम गॉर्की, दोस्तोव्हस्की किंवा अप्टन सिंक्लेयर यासारख्या लेखकांच्यामध्ये विविध मानवी स्तरांचा जो पट दिसून येतो तसा वर्णपट अण्णा भाऊ वगळता कोणत्याच लेखकामध्ये दिसून येत नाही. अण्णा भाऊ जातींच्या, धर्मांच्या, पक्षांच्या आणि देशांच्याही पलीकडे जाणारे लेखक आहेत. त्यांना दलित लेखक, कम्युनिस्ट लेखक, मातंग जातीचे लेखक म्हणणे हा त्यांचा अपमान आहे. ते मानववादाचे पाईक आहेत. येथे मी मानवतावाद म्हणत नाही. कारण मानवतावाद दया व कीव यांनी प्रेरित असतो. परंतु मानववाद हा सह-अनुभूतीने प्रेरित असतो. माओच्या लाँग मार्चमध्ये सामील झालेल्या जनतेचा ते गौरव करतात. स्टॅलिनग्राडच्या क्रांतिकारकांना ते डोक्यावर घेतात. त्याच वेळेला मुंबईचे कामगार, शेतकरी तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे कार्यकर्ते या सर्वांच्या विषयी त्यांची लेखणी सारख्य़ाच तेजाने तळपताना दिसते. स्पेनमधील विद्रोहाची हकीकत वाचून ते स्पेनचा पवाडा लिहायला घेतात परंतु तेथे हुकूमशाही आली हे समजताच ते त्यावर लिहिणे बंद करतात. अण्णा भाऊ लोकराज्याचे पुरस्कर्ते आहेत आणि हुकूमशाहीचे विरोधक आहेत. ते केवळ लेखक नाहीत तर तत्त्वज्ञ आहेत आणि व्यवस्था परिवर्तनासाठी साहित्य ही त्यांची भूमिका आहे. म्हणून ते मिथकांना नवा अर्थ देतात आणि बदलासाठी महापुरुषांना बरोबर घेतात. ते म्हणतात, ‘ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून दलितांच्या तळहातावर तरलेली आहे. या दलितांचे जीवन सुखी व समृद्ध कसे होईल याची काळजी करूया.’ त्यांना आपआपल्या रिंगणात कोंडणाऱ्यांनी त्यांचा महाराष्ट्राची परंपरा हा पवाडा वाचायला हवा. त्याच्या चौथ्या चौकामध्ये त्यांनी वासुदेव बळवंत फडके, महात्मा फुले, टिळक आणि आंबेडकर या साऱ्यांचे स्मरण केले आहे.
‘राजा शिवछत्रपती, टिळक,
महात्मा फुले जोती।
आंबेडकर आले उदयाला,
पारतंत्र्य गे विलयाला।।’
‘देशभक्त घोटाळे’ या लोकनाट्याच्या सुरुवातीलाच ते टिळक, फुले, आंबेडकर, बापट, नाना पाटील, श्रीपाद डांगे नाविकांच्या बंडातील हुतात्मे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील १०५ हुतात्म्यांना वंदन करतात. ही गोष्ट अण्णा भाऊंच्या सर्वसमावेशक समन्वयवादी मानववादाची द्योतक आहे.अण्णा भाऊंनी 35 कादंबऱ्या लिहिल्या. तेथेही त्यांच्या कादंबऱ्यांच्यामध्ये ग्रामसंस्कृतीचा संपूर्ण पट दिसून येतो. ते कोणत्याही जातीला गुण किंवा अवगुण चिकटवत नाहीत. हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. विद्रोही असला तरी त्यांचा नायक हा न-नायक किंवा खलनायक नसतो. त्यांची पात्रे जातीप्रमाणे न वागता माणसाप्रमाणे वागतात. त्यात सत्त्वशील पाटील, रंगेल पाटील, क्रूर पाटील हे सारेच असतात. चांगले ब्राह्मण, वाईट ब्राह्मण, चांगले दलित, वाईट दलित यांचे चित्रण अण्णा भाऊ कोणत्याही अभिनिवेशाशिवाय करतात. त्यांच्या लेखणीच्या आवाक्यामध्ये केवळ गावगाडाच नाही तर त्या बाहेरचेही माकडवाले, गोसावी, गारुडी, कंजारभाट हे आपआपल्या संस्कृतीसह येतात.अण्णा भाऊंच्या लेखनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या लेखनातून वाहणारा निखळ नैतिकतेचा झरा. त्यामुळे अण्णा भाऊ आपल्या एकूण साहित्यातून एक संपूर्ण बंडखोर, परिवर्तनवादी, नास्तिक आणि मानववादी तत्त्वज्ञान समाजामध्ये प्रवर्तित करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या देशामध्ये माणसांना चौकटीत कोंडण्याचा अट्टाहास असल्याने अण्णा भाऊंच्या मोठेपणाचे मूल्यमापन अद्याप झाले नाही ते झाले तर भारताला नव्या मानववादी क्रांतीचा मार्ग सापडेल यात शंका नाही.
– प्रा.सचिन पवार
निर्भीड पत्रकार पाटोदा.