शरद पवार 16ऑगस्ट पासून महाराष्ट्र दौरा ;सुरुवात मात्र आष्टीतून ?
बीड | प्रतिनिधी
शरद पवार हे येत्या १६ ऑगस्टपासून महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात करणार असल्याचे बोलले जात आहे.तसेच शरद पवार या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात आष्टी विधानसभा मतदार संघातून करण्याची शक्यता आहे.
या वृत्ताला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आणि राष्ट्रवादी विधी सेलचे मराठवाडा उपाधक्ष्य ॲड. नरसिंह जाधव यांनीही दुजोरा दिला आहे. नुकतीच ॲड. जाधव यांनी शरद पवार यांची मुंबई येथे सिल्वर ओक निवास स्थानी भेट घेतली.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र दौऱ्याला सुरूवात केली होती. यावेळी त्यांनी सातारा आणि येवल्यात सभा देखील घेतल्या होत्या. यानंतर आता संसदेचे आणि महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर शरद पवारांचा महाराष्ट्र दौरा सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.त्यानंतर मात्र शरद पवारांनी राज्यातील विविध जिल्ह्यांत सुरु असलेल्या पावसाचे कारण देत पुढील दौरा रद्द केला होता. परंतु,आता पुन्हा नव्याने पक्ष बांधणीसाठी शरद पवार हे महाराष्ट्र दौरा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी रोजी राष्ट्रवादीतून बाहेर पडत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांसह महत्वाचे नेते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन गटात विभागला गेला आहे.त्यानंतर काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नावावर आणि घड्याळ या चिन्हावर निवडणूक आयोगात दावा केला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष नेमका कुणाचा हे येत्या काही दिवसांत निवडणूक आयोगात स्पष्ट होणार आहे.अशातच आता दुसरीकडे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात सभा घेऊन पक्षबांधणीसाठी पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचे नियोजन सुरु केले आहे.काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात सभा घेतली होती. त्यावेळी राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले होते.