वन विभागाने अडवले काम ; फुकेवाडीकरांचे हाल कायम!
बीड | प्रतिनिधी
बीड तालुक्यातील फुकेवाडी येथील ग्रामस्थांना डोंगराळ भागातून रस्त्याची अडचण असल्याने यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत तब्बल पावणे दोन कोटी रुपये निधी दिला आहे. मात्र, वन विभागाने हे काम आडवल्याने रस्ता रखडला असून कंत्राटदार पेचात सापडले आहेत. यात, फुकेवाडी ग्रामस्थांचे हाल मात्र कायम आहेत.
बीड तालुक्यातील पिंपरनई ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत फुकेवाडी हे डोंगर दऱ्यात वसलेले ५० घरांचे छोटे गाव आहे. याठिकाणी ४ थी पर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे. बहुतांश ग्रामस्थ ऊसतोड मजूर आहेत. डोंगरदऱ्यातील सिताफळ,लिंबु आदि रानमेवा विकुन उदरनिर्वाह चालवता. यांना बाजारहाट , दवाखाना,शाळा आदींसाठी अडीच किलोमीटर डोंगर चढून ८ किलोमीटर अंतरावर लिंबागणेश याठिकाणी जावे लागते.बीड शहरापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात अद्याप बस पोहोचलेली नाही. २००९ साली शासकीय निधीतून कच्चा रस्ता करण्यात आला होता.मात्र मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत अडीच किलोमीटर डोंगराळ भागातील रस्त्यांसाठी १६८.७७ लक्ष रुपये निधी मंजूर होऊन डी.बी.कनस्ट्रक्शन मार्फत रस्ता कामाला सुरुवात झाली आहे.मात्र वन विभागाच्या जागेतून हा रस्ता जात असल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्ता अडवला आहे दरम्या वन विभागाची भुमिका आडमुठेपणाची व अन्याय कारक असुन यासाठी लवकरच आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ. गणेश ढवळे यांनी सांगितले.